पीक उत्पादनात कीडरोगांचे व्यवस्थापनास अनन्य साधारण महत्व आहे. दर वर्षी किड रोगांमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते, त्यामुळे कीडरोगांचे व्यवस्थापनासाठी मोठया प्रमाणात रसायनिक कीटकनाशकाचा वापर होतो. दिवसेदिवस रसायनिक कीटकनाशकाच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे पीक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. रासायनिक कीटकनाशकंच्या अतिवापरामुळे कीडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होवून ते किड रोगास दाद देत नाहीत, त्यामुळे शेतकरी जास्त तिव्रतेची कीटकनाशके वापरत आहेत. कीटकनाशकांचे वापरामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित झाले आहेत. तसेच अन्नधान्यमध्ये किटकनाशकांचे उर्वरीत अंश राहून अनेक शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत. यावर प्रभावी उपाय आहे तो म्हणजे एकात्मिक किड व्यवस्थापन.
एकात्मिक किड व्यवस्थापनात जैविक कीडनाशकांच्या वापरास प्रथम स्थान आहे. जैविक कीडनाशकांच्या वापरामुळे रसायनिक कीडनांशकाचा वापर कमी होवून उत्पादन खर्चात बचत होते. पर्यावरणाचे रक्षण होते. जैविक कीडनाशकांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात शासनामार्फत दहा जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमार्फत गुणवत्तायुक्त जैविक कीडनाशकांचे उत्पादन करण्यात येवून जैविक किटकनाशके रास्त भावात शेतककयांना उपलब्ध करुन देण्यात येतात. या प्रयोगशाळेमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनस या जैविक औषधाचे उत्पादन केले जाते. बिव्हेरिया व व्हर्टीसिलीयम या जैविक घटकांचे सीआयबी रजीस्ट्रेशन केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.