सलग समतल चर

सलग समतल चर

राज्यातील पडीक अवस्थेतील क्षेत्र उत्पादनक्षम व्हावे यासाठी राज्य शासनाने पडीक/अवनत जमिनीचा विकास करण्यासाठी ठोस कार्यक्रम आखलेला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सलग समतल चर हा मृद व जलसंधारणाचा एक प्रभावी उपचार राबविला जातेा. यामध्ये अतिउताराच्या पडीक क्षेत्रावर समपातळी चर खोदून वृक्ष लागवड केली जाते.

उद्देश -

  • डोंगर माथ्यावर वेगाने वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याची गती कमी करणे.
  • जमीनीची धूप कमी करणे.
  • वाहत येणाऱ्या पाणीचरा मुळे व गवत अगर झाडांमुळे अडून राहून जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते.
  • पडीक जमिन उत्पादनक्षम बनून काही प्रमाणात हे क्षेत्र लागवडीखाली आणले जाते.
  • उपचार योग्य पडीक सिमांतिक जमिनीचा विकास प्रभावीपणे वेगाने केला जातो.

क्षेत्राची निवड -

  • पाणलोट क्षेत्रामधील शेतीस अयोग्य असलेल्या क्षेत्रावर हा उपचार घेण्यात येतो.
  • सदर उपचार घेणेसाठी पडीक क्षेत्रातील खातेदारांची संमती आवश्यक आहे.
  • पाणलोट क्षेत्रातील वरच्या व मधल्या भागात ज्या क्षेत्राचा उतार 33 टक्केपर्यंत आहे अशा क्षेत्रावर सलग समपातळी चर घेतले जातात.

पाणलोट क्षेत्रामधील शेतीस अयोग्य असलेल्या पडीक व अवनत जमिनीमध्ये प्रामुख्याने मृद आणि जलसंधारण करण्यासाठी सलग समपातळी चर कार्यक्रम राबविला जात आहे. यामध्ये 0 ते 33 टक्के ऊताराच्या जमिनीवर 0.60 मी. रुंद व 0.30 मी. खोल तसेच 0.60 मी. रुंद व 0.45 मी. खोल या आकाराचे सलग समपातळी चर खोदण्यात येत असुन मॉडेल निहाय व जमिनीच्या उतारानुसार चराची लांबी 833 मी. ते 2174 मी. आहे. आखणी केल्याप्रमाणे 0.60 मी. व 0.30 मी. अथवा 0.45 मी. खोलीचे सलग समतल चर खोदून उताराच्या बाजूस मातीचा बांध/भराव घालावा. चराचे काम मंजूर मॅडेलप्रमाणे चराची लांबी व मधील गॅप सोडून करावे. दोन चरामधील सोडलेली गॅप एकाखाली एक येणार नाही हे पाहून स्टॅगर्ड पद्धतीने खोदावेत. मातीच्या भरावावर स्थानिक झाडे झुडपांचे व गवताचे बियाणे पावसाळ्याच्या सुरुवातीस पुरेसा ओलावा पाहून पेरण्यात यावे. साधारणपणे प्रति हजार रनिंग मीटर लांबीमध्ये 0.30 मी. खोलीच्या चरामध्ये 180 घ.मी. व 0.45 मी. खोलीच्या चरामध्ये 270 घ.मी. पाणी साठा होतो. सलग समतल चराचा सलग 10 हेक्टरचा गर असल्यास अशा गटाभोवती गुरे प्रतिबंधक चर (TCM) खोदण्यात यावा.

गुरे प्रतिबंधक चराचे (T.C.M.) तांत्रिक मापदंड खालीलप्रमाणे आहेत.

  • चराची पाया रूंदी 0.60 मी.
  • चराची खोली 1.00 मी.
  • चराचा माथा 1.90 मी.
  • प्रति हेक्टरी चराची लांबी 102 मी.

वरील आकारमानाचा गुरे प्रतिबंधक चर खोदुन निघालेल्या मातीपासुन उतराकडील बाजूस 1.0 मी. उंचीचा बांध तयार करावा. गुरे प्रतिबंधक चरालगतचे मातीचे बांधाचे माथ्यावर कुंपन म्हणून प्रति हेक्टरी 100 घायपात सकर्सची लागवड करावी.