बोडी दुरुस्ती व नुतनीकरण

बोडी दुरुस्ती व नुतनीकरण

विदर्भातील जिल्हयांत पूर्वपार पध्दतीने भात शेताच्या जमिनीच्या वरच्या भागात मातीचे बांध करुन छोटे जलाशय तयार करतात व त्यांत पाणी साठवितात. साठविलेले पाणी आवश्यकतेनुसार जलाशयाच्या खालच्या भागातील भात शेतीला देतात. या छोटया तलावास विदर्भात बोडी असे म्हणतात. या बोडीमध्ये काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार लहान प्रमाणांत मत्स्य व्यवसाय देखील करतात.

पूर्वपांर बांधलेल्या बोडीची आता फुटतूट झाल्याने तसेच त्यात गाळ साठलेला असल्याने या जुन्या बोडींचे खोलीकरण व नूतनीकरण करणे आवश्यक ठरले आहे. बोडींचे खोलीकरण / नूतनीकरण करणे हे शेतक-यांना आर्थिक दृष्टया शक्य नसल्याने ते शासनामार्फत करुन दिले जाते. पावसाअभावि भात पिकास पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात मोठया प्रमाणात घट होते अशा वेळी बोडीतून सरंक्षक पाणी दिल्यास शेतक-यांचे नुकसान टाळले जाते. बोडी ही वैयक्तिक लाभाधारक योजनेतंर्गत मोडते. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयामध्ये जलसंधारणाचा एक परिणामकारक उपाय म्हणून जुन्या बोडीचे नुतनीकरण केले जाते.

योजनेचे उद्देश :-

  • भुपृष्ठावरुन वाहून जाणारे पाणी अडविणे व पुर्नभरण करणे.
  • आपतकालीन परिस्थितीत भात पीकास संरक्षीत जलसिंचन करणे.
  • संरक्षीत सिंचनामुळे खरीप व रब्बी हंगामातील पीकांचे उत्पादन वाढविणे.
  • मत्स्यपालन करणे.
  • मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देणे.

बोडीची निवड :-

  • ज्या बोडीमध्ये गाळ साठला आहे व बोडीची फुटतुट झाली आहे अशी 50 ते 100 मी. लांबीची बोडी निवडली जाते.
  • ज्या जुन्या बोडीचा छेद मुळ छेदापेक्षा 50 टक्के कमी असेल अशी बोडी प्राधान्याने निवडली जाते.
  • ज्या बोडीची दुरुस्ती करावयाची आहे त्या लाभधारकाची लेखी संमती अपरिहार्य असते.

बोडीची उंची 1.5 मीटर व 2 मीटर अशा 2 प्रकारात निश्चित केलेली आहे.

त्यानुसार बोडीचा तपशिल खालील प्रमाणे.-

अ.क्र. बाब 1.5 मी. उंचीची बोडी 2 मी. उंचीची बोडी
1 मुख्य बांधाची लांबी (3 प्रकार) 50 मी. किंवा 70 मी. किंवा 100 मी. 50 मी. किंवा 70 मी. किंवा 100 मी.
2 मुख्या बांधाची माथा रुंदी 1 मी. 1 मीटर
3 बाजू उतार (आतील व बाहेरील अशा दोन्ही बाजूस) 1 : 1.5 1 : 1.5

बोडी नुतनीकरण बांधाचे संकल्पचित्र

1.50 मी. उंचीच्या बोडीचे बांधाचा उभा छेद.

2.00 मी. उंचीच्या बोडी बांधाचा उभा छेद