विहीर पुनर्भरण

विहीर पुनर्भरण

योजनेचे उद्देश :-

  • कृषि क्षेत्रात सिंचनासाठी आस्तित्वात असलेल्या विहीरींचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.
  • पाण्याची शुध्दता वाढविणे.
  • दुष्काळग्रस्त भागामध्ये जास्तीत-जास्त पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.

विहीर निवडीसाठीचे तांत्रिक निकष :-

  • प्रत्येक पाणलोटांतर्गत साठवण क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र व सर्वात शेवटी अपधाव क्षेत्राअंतर्गतच्या विहीरींचा विचार करुन एकत्रितपणे (cluser approach) हा उपक्रम राबविण्यात यावा.
  • विहीरीची निवड करीत असताना त्याची खोली पुरेशी असावी जेणेकरुन त्या भागात अस्तित्वात असलेला जलधारक खडक पूर्णपणे भेदलेला असावा. त्यामुळे विहीर पुनर्भरण करुन कृत्रिमरित्या भुजल उपलब्धतेत वाढ करणे शक्य होईल.
  • ज्या विहीरींना रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते किंवा ज्या विहीरीमधील ऑक्टोबर महिन्यातील पाण्याची पातळी सरासरी 4 मिटरपेक्षा खाली असेल अशाच ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात यावा. जेणेकरुन पावसाळयात विहीरीत पाणी मुरवणे शक्य होईल.
  • गावातील जास्तीत जास्त विहीरी एकत्रितपणे या योजनेसाठी निवडण्यात याव्यात. जेणेकरुन त्याचा फायदा लगेचच गावाला मिळणे शक्य होईल.
  • विहीरींची निवड करीत असताना पाणथळ क्षेत्र अतिपाणी वापरामुळे खारवट झालेले क्षेत्र व प्रदुषणाची समस्या असलेले क्षेत्र टाळण्यात यावे
  • पहिल्या पावसाचे पाणी किंवा अति गढूळपाणी फिल्टरमध्ये कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही याची काळजी घ्यावी. फिल्टरच्या माध्यमातुन विहीरीत जाणारे पाणी गाळ विरहीतच असावे. त्याचबरोबर प्रदूषित घटकांचा अंतर्भाव होणार नाही यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात याव्यात. उकिरडयावरील अथवा सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी फिल्टरमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी. फिल्टर हा विहीरीच्या वरील बाजूसच करण्यात यावा. फिल्टर करीत असताना तो मजबूत व टिकाऊ असेल याची दक्षता घ्यावी. त्याच्या खोदकामाच्या वेळी अथवा विहीरीला पाईपद्वारे जोडत असताना विहीरीला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी फिल्टर व विहीर यामध्ये समयोचीत अंतर ठेवावे. अंतर कमी असल्यास फिल्टरमधील पाण्याच्या दाबामुळे विहीर ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • शेतामधील जास्तीत जास्त पाणी विहीर पुनर्भरणासाठी उपलब्ध व्हावे या करिता आवश्यकतेनुसार चरांसारखी व्यवस्था लाभधारकाच्या मदतीने करुन घ्यावी.
  • पावसाचे पाणी, जमीनीवरील पाणी अथवा ओढयाचे पाणी खूप जास्त प्रमाणात येण्याची शक्यता असल्यास जादाचे पाणी फिल्टरपासून दूर काढून देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन फिल्टरला होणारा पूराचा धोका टाळता येईल.

विहीर पुनर्भरणाची रचना व संकल्प चित्र :-

विहीरीचे पुनर्भरण करण्यासाठी शेतामधुन येणारे पाणी हे चारीद्वारे हौदात आणले जाते. ज्या ठिकाणी गाळ साठवण हौद व चाळणी खड्डा (फिल्टर) एकत्रित आहेत अशा ठिकाणी हौदाचा आकार 1 ते 2 मीटर रुंद, 1 ते 2 मीटर लांब व 1 ते 2 मीटर खोल असा शेताच्या आकारमानानुसार असावा. हौद व चाळणी खड्डा यांची भिंतीद्वारे विभागणी करावी. सदर भिंतीची उंची ही एकूण खड्डयाच्या खोलीच्या तिन चतुर्थांश असावी. चाळणी खड्डा हा स्थानिक मोठे दगड, छोटे दगड, गोटे, विटा, जाड वाळू, बारीक वाळू अशा प्रकारे तळापासून वरपर्यत भरुन घ्यावा. चाळणी खड्डयाच्या (फिल्टर) तळभागातून 3 इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप विहीरीस जोडण्यात यावा. मातीच्या प्रकारानुसार स्थानिक पातळीवर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सल्यानुसार गरजेवर आधारीत संकल्पचित्रामध्ये किरकोळ स्वरूपाचे फेरबदल करण्यांस हरकत नाही