राज्यातील कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण
कृषिमाल उत्पादन, विक्री व साठवणुक करतांना विविध रोग व कीडींचा प्रादुर्भाव होतो. त्यावर नियंत्रणासाठी वेगवेगळया कीडनाशकांचा वापर करावा लागतो. अतिसावधानतेमुळे व अज्ञानामुळे कीडनाशकांचा जादा व अनावश्यक वापर होतो व त्यामुळे कृषि मालाची काढणी झाल्यानंतर त्यात कीडनाशक रसायनाचा अंश ब-याच प्रमाणांत आढळून येतो. ठराविक मर्यादेच्या बाहेर किंवा जादा प्रमाणांत अंश असल्यास तो मानवी जीवनाला घातक ठरु शकतो.
कृषिमालाची निवड करतांना रंग, चव, आकार, पौष्टीकता सारख्या गुणधर्मा बरोबरच कीडनाशक उर्वरीत अंशाच्या पातळीस अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतीक आरोग्य संघटना आणि अन्न व कृषि संघटना यांच्या संयुक्त आयोगाने अशा कीडनाशक अंशाची क्षम्य मर्यादा ठरविली आहे. बरीच राष्ट्रे स्वत:च्या वेगवेगळया क्षम्य मर्यादा ठरवीत आहेत.
जागतीक व्यापार संघटना व त्यातील विविध करारामुळे कृषिमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. आयात करणारे राष्ट्र कृषि मालात कीडनाशक उर्वरीत अंशाचे प्रमाण व त्याची मर्यादा याची बारकाईने पाहणी करीत आहेत. त्यामुळे निर्यातक्षम मालात असे अंश कमीत कमी कसे राहतील यासाठी शेतकरी, व्यापारी व निर्यातदार प्रयत्नशील आहेत. निर्यातक्षम मालांत अशी तपासणी करणे चालू आहे. केवळ निर्यातक्षम मालातच उर्वरीत अंश मर्यादीत ठेवण्यासाठी तपासणी करणे योग्य होणार नाही, तर घरगुती स्थानिक बाजारपेठेतील कृषि मालात उर्वरीत अंश तपासणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
गुणनियंत्रण निरीक्षकाकडून शेतातून काढणी योग्य विक्रीपुर्व मालातून बाजारपेठातील ठोक व किरकोळ विकेत्याकडून नमूने घेऊन त्याची कृषि विभागातील प्रयोगशाळेत तपासणी करता येते.
कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा, पुणे व नागपूर येथे कार्यान्वीत आहेत. सदर प्रयोगशाळांचा स्थापनेबाबतचा तपशील खालील प्रमाणे.
अ.क्र. |
कीडनाशके उर्वरीत अंश प्रयोगशाळा |
स्थापनेचे वर्ष |
पत्ता व दुरध्वनी क्रमांक |
एन.ए.बी.एल. |
1 |
कीडनाशके उर्वरीत अंश प्रयोगशाळा, पुणे |
1973-74 |
कृषि भवन, शिवाजीनगर, पुणे 411004, दुरध्वनी क्रमांक 020-25510300 |
एन.ए.बी.एल. मानांकन प्राप्त |
2 |
कीडनाशके उर्वरीत अंश प्रयोगशाळा, नागपूर |
2000-01 |
कृषि महाविद्यालय आवार, महाराज बाग, नागपुर, -440001, दुरध्वनी क्रमांक 0712-2559903 |
एन.ए.बी.एल. मानांकन प्राप्त. |
वरील प्रयोगशाळेत फळे, भाजीपाला, मसाल्याची पीके, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे व मांस तसेच शितपेये व विविध कृषि उत्पादनातील कीटकनाशकांचे उर्वरीत अंश गुणवत्ता तपासण्यात येतात. सदर प्रयोगशाळेत शेतकरी, नागरीक अथवा सरकारी, निमसरकारी संस्था, सहकारी संस्था यांचेकडील नमुने तपासुन घेऊ शकतात.
कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळेमध्ये एक किंवा अनेक कीटकनाशकांच्या अंशाची तपासणी केली जाते एका कीडकनाशकाच्या अंश तपासणी करीता रुपये 2500/- व एका पेक्षा जास्त कीडनाशकांच्या अंश तपासणी करीता रुपये 5000/- नमुना याप्रमाणे शुल्क आकारणी केली जाते.
कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा, पुणे यांना दिनांक 04/08/2012 रोजी आय.एस.ओ.17025: 2005 एन.ए.बी.एल. मानांकन प्राप्त झाले आहे. अपेडा मार्फत दरवर्षी प्रयोगशाळांना मानांकन प्रदान करण्यात येते. सन 2009-10 मध्ये कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा, पुणे येथील प्रयोगशाळेस अपेडाचे मानांकन प्राप्त होते. त्याकरिता निर्यात होणा-या द्राक्ष पिका करिता एकूण 177 कीटकनाशकांचे उर्वरीत अंश ची तपासणी करण्यासाठी रक्कम रुपये 5000/- अधिक सेवाकर याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत होते.
प्रयोगशाळेत मागील 7 वर्षात तपासणी केलेल्या नमून्यांची माहिती
वर्ष |
क्षमता (संख्या) |
प्राप्त (संख्या) |
तपासणी(संख्या) |
क्षम्य मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळून आलेले नमुने (संख्या) |
अप्रमाणित प्रमाण (%) |
2008-09 |
700 |
849 |
849 |
55 |
6.47 |
2009-10 |
700 |
453 |
448 |
23 |
5.13 |
2010-11 |
700 |
555 |
520 |
04 |
0.77 |
2011-12 |
1300 |
835 |
835 |
29 |
3.47 |
2012-13 |
1300 |
814 |
811 |
0 |
0.00 |
2013-14 |
1300 |
1004 |
1003 |
0 |
0.00 |
2014-15 |
1300 |
1347 |
1342 |
16 |
1.19 |
सदर प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सन 2014-15 मध्ये उपलब्ध झालेल्या अनुदानातून एन.ए.बी.एल.,(आय.एस.ओ.: 17025/2005) मानांकन, उपकरणांची क्षमतावृध्दी, उपकरणे, संदर्भीय रसायने व काचपात्रे, प्रयोगशाळांचे गौण बांधकाम, प्रयोगशाळांचे विद्युतीकरण ई. बाबीवर खर्च करण्यात आलेला आहे.
RKVY अंतर्गत प्रयोगशाळानिहाय झालेल्या सन 2014-15 खर्चाची माहिती पुढील प्रमाणे (र.रु. लाखात)
अ.क्र. |
प्रयोगशाळेचे नांव |
कृति आराखडा |
1 |
कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा , पुणे |
25.80 |
2 |
कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा , नागपुर |
27.46 |
3 |
आयुक्तालयस्तर |
21.74 |
|
एकूण |
75.00 |
सदर योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून सदर प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात आल्यामुळे प्रयोगशाळेत खालीलप्रमाणे कार्यवाही करणे शक्य झालेले आहे.
- पुणे व नागपूर प्रयोगशाळांस एन.ए.बी.एल., मानांकन
- नमुने शिघ्रतेने तपासणी करणे शक्य.
- संगणकीय प्रणाली विकसित व कार्यान्वित.
- प्रयोगशाळेत कीडनाशकांचे उर्वरीत अंश तपासणीची सुविधा उपलब्ध.
- बाजारातील सेंद्रीय कीटकनाशकांमध्ये रासायनिक कीटकनाशकाची भेसळ तपासणीची सुविधा.
- बाजारातील जैविक खतामध्ये रासायनिक खताची भेसळ तपासणीची सुविधा.
- अधुनिक उपकरणामुळे तपासणीतील अचूकतेत वाढ
- बाजारात उपलब्ध असलेल्या कृषि उत्पादनातील कीटकनाशकांच्या उर्वरीत अंश तपासणी आधारे जनजागृती
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विश्लेषण अहवालासोबत क्रोमॅटोग्राफ देणे शक्य.
पुढील तीन वर्षाचे नियोजन
- निर्यात होणा-या कृषि मालासाठी तपासणी करिता येणारे नमुन्याची माहिती जलद गतीने संबंधीत शेतक-यांना व निर्यातदारांना उपलब्ध होण्यासाठी अद्यावत संगणकीय प्रणाली विकसीत करणे.
- डॉ.स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार प्रथम कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा, नाशिक येथे स्थापन करणे.
- देशातील कृषि मालाची आयात करणा-या देशाच्या मानांकनानुसार प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणे.
- कीडनाशके उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा, नागपुर येथे मसाल्याच्या पदार्थातील उर्वरीत अंश तपासणीची सुविधा निर्माण करुन विदर्भातील मिरची व त्यासारख्या इतर कृषि मालाचे उत्पादन करणा-या शेतक-यांना निर्यातीसाठी त्यांच्या मालातील कीटकनाशकांचे उर्वरीत अंश तपासणीची सुविधा निर्माण करुन देणे.
- उपलब्ध मनुष्य बळावरच आधुनिक उपकरणाव्दारे प्रयोगशाळांची क्षमतावृध्दी करणे.